मुंबई : बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता चेक (धनादेश) क्लिअर होण्यासाठी दोन दिवस थांबावे लागणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंग सिस्टीममध्ये केलेल्या सुधारणांमुळे आजपासून धनादेश काही तासांतच पास होऊन रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.
आरबीआयच्या नव्या नियमांनुसार शनिवारीपासून विद्यमान चेक ट्रान्झक्शन सिस्टीम (CTS) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या बदलांमुळे बँकांच्या प्रक्रियेला अधिक वेग येणार असून, ग्राहकांना होणारी गैरसोय कमी होईल. विशेष म्हणजे, या नव्या यंत्रणेमुळे मानवी चुकांमुळे होणारी फसवणूक टळेल, असेही आरबीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ही नवी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, ४ ऑक्टोबर २०२५ पासून ३ जानेवारी २०२६ पर्यंत बँकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चेकवर कन्फर्मेशन द्यावे लागेल. जर ठरावीक वेळेत उत्तर मिळाले नाही तर चेक आपोआप पास होईल.
दुसरा टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. यात बँकांना चेक प्राप्त झाल्यानंतर तीन तासांच्या आत त्याची क्लिअरन्स द्यावी लागणार आहे. उदाहरणार्थ, ग्राहकाने सकाळी १० वाजता चेक जमा केल्यास तो दुपारी १ वाजेपर्यंत खात्यात जमा होईल.
या नव्या प्रणालीमुळे व्यवहारातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढणार असून, ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारात मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे बँकिंग सेवेत वेग, अचूकता आणि सोयीसुविधांचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे मानले जात आहे.
Leave a Reply