मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत. राज्यातील जनतेची इच्छा आहे की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हाती घ्यावीत, अशी भूमिका मांडत उद्धव ठाकरे यांनी या इच्छेचा स्वीकार केला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे याबद्दल बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, मनसेशी (MNS) युती करण्यासाठी ठाकरे गट कोणताही त्याग करायला तयार आहे. “आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की, मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे,” असे राऊत म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे कधीही तुटेपर्यंत ताणत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेना ही डरपोकांची संघटना नसून मर्दांचा महासागर आहे, असे सांगत, काही लोकांनी पाठीवर वार केले असले तरी शिवसेना लढत राहील, असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.
शिंदे गटावर राऊतांचा निशाणा: “संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरावा!”
आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना, संजय राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली. “आज काही हौशे-नवशे देखील त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहेत. त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा काय संबंध आहे? त्यांनी संस्थापक म्हणून अमित शाहांचा फोटो वापरला पाहिजे,” असा टोला राऊत यांनी लगावला.
मुंबईत शिवसेनेचे दोन वर्धापन दिन मेळावे आणि माजी नगरसेवकांची स्थिती
आज मुंबईत शिवसेनेचे (ठाकरे गट आणि शिंदे गट) दोन वर्धापन दिन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाकरे गटाच्या शिवसेनेने कालच माजी नगरसेवकांची बैठक घेतली. सहा महिन्यांनंतर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली होती. ३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठाकरे गटासोबत ६४ माजी नगरसेवक होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत ९ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ५५ माजी नगरसेवक आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट ‘डॅमेज कंट्रोल’साठी रणनीती आखत आहे आणि बैठका घेत आहे. आजच्या वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply