नांदेड: हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांनी सासरच्या मंडळींनी विष पाजून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील राठोडवाडी (अखरगा) येथे घडली आहे. ताऊबाई सुधाकर राठोड (१८) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती सुधाकर राठोड याला अटक करण्यात आली असून, पतीसह सासरा, सासू आणि दिरावर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसूर तांडा येथील वामन चव्हाण यांची मुलगी ताऊबाई हिचे लग्न २ जुलै रोजी राठोडवाडी (अखरगा) येथील सुधाकर राठोडसोबत झाले होते. लग्नात ६ लाख रुपये हुंडा आणि ३ तोळे सोने देण्याचे ठरले होते. ताऊबाईच्या वडिलांनी लग्नाच्या वेळी ५ लाख रुपये हुंडा, एक तोळ्याची अंगठी आणि २ तोळ्यांचे लॉकेट दिले होते.
लग्नानंतर मुलगी आणि जावयास परतणीसाठी बोलावले असता, जावई सुधाकरने ताऊबाईच्या वडिलांकडे राहिलेले १ लाख रुपये हुंडा आणि दूध डेअरी टाकण्यासाठी पैसे आणण्याची मागणी करत ताऊबाईला धमकावले होते. ९ जुलै रोजी ताऊबाई सासरी गेली. त्यानंतर, ११ जुलै रोजी सकाळी ७ वाजता ताऊबाईला उलट्या होत असल्याचा निरोप तिच्या वडिलांना मिळाला.
तातडीने वामन चव्हाण मुलीच्या सासरी पोहोचले. ताऊबाईला मुखेड येथे प्राथमिक उपचार करून नांदेडला हलवण्यात आले. त्यानंतर, तिला उपचारासाठी हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना १३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा मृत्यू झाला. ताऊबाईने १२ जुलै रोजी, म्हणजेच मृत्यूपूर्वी, पती, सासरा, सासू आणि दीर यांनी आपल्याला जबरदस्तीने विष पाजल्याचे सांगितले होते. तिच्या या जबाबानुसार, वामन चव्हाण यांच्या तक्रारीवरून मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी झालेला हा अमानवीय खून समाजाला अंतर्मुख करणारा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे.
Leave a Reply