बारामती : यावर्षी काय पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यामुळे यावर्षीचे आहे तेच पिककर्जाचे पैसे भरा, अशा स्पष्ट शब्दात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबद्दल विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, अशी चर्चा होत आहे. त्यात यंदाच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, या आशेवर शेतकरी बसले होते. मात्र कर्जमाफी तर नाहीच परंतू शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय देखील अर्थसंकल्पात घेण्यात आले नाही. अजित पवार म्हणाले, आपल्याला वारंवार कर्जमाफीचे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र यावर्षी काय पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नसल्याचं ते थेटच बोलले. त्यासोबतच 31 तारखेच्या आज घेतलेल्या पीककर्जाचे पैसे भरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. ते बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, आजच्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही पुढचे निर्णय घेत आहोत. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे या वर्षी पण आणि पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा, असे आवाहन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. मात्र, शून्य टक्के व्याज दराने तुम्हाला कर्ज मिळावे, यासाठी बँकेला जे पैसे भरावे लागतात ती सर्व रक्कम म्हणजेच हजार ते बाराशे कोटी रुपये बँकेला देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. हा पैसा मी एकट्याने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे. तुम्हाला जरी माफी दिसत असली तरी त्याचे पैसे सरकार महावितरण भरत असते. तसेच लाडक्या बहिणीसाठी देखील अर्थसंकल्पात मोठया प्रमाणात तरतूद करावी लागली आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. इतकेच नाही तर राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वाचे पगार आणि निवृत्तीवेतन आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज, याला साडेतीन लाख कोटी रुपये आणि हे 65 हजार कोटी असे चार लाख पंधरा हजार कोटी तर यात जात असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे


Leave a Reply