महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू असतानाच देशातल्या एका राज्याने औरंगजेबाशी संदर्भ असलेल्या शहराचं नाव बदललं आहे. औरंगजेबपूर या शहराचं नाव आता शिवाजी नगर करण्यात आलं आहे. याशिवाय महाराष्ट्रातल्या आणखी दोन राष्ट्रपुरुषांची नावंही शहरांना देण्यात आली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावंही शहरांना देण्यात आली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंह नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी ईदच्या दिवशीच या जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. या बदलानंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटले आहे की हे नामांतर नागरिकांच्या भावना, भारतीय संस्कृती आणि वारशानुसार केले जात आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विविध ठिकाणांच्या नावांमध्ये जनभावना आणि भारतीय संस्कृती आणि वारशाला अनुसरून बदल केले जातील. याद्वारे, लोक भारतीय संस्कृती आणि तिच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांकडून प्रेरणा घेऊ शकतात.
मुख्यमंत्री धामी यांनी सांगितलं की, हे नामांतर भारतीय संस्कृती आणि वारशाचा आदर करत, नागरिकांच्या भावना व विचारांच्या आधारे करण्यात आलं आहे. तसेच, भविष्यात विविध ठिकाणांच्या नावांमध्ये भारतीय संस्कृतीचा आणि महापुरुषांच्या योगदानाचा अधिक आदर केला जाईल.या बदलांच्या अंतर्गत, देहरादून जिल्ह्यात मियांवालाचे नाव रामजी वाला, पीरवालाचे नाव केशरी नगर, चांदपूर खुर्दचे नाव पृथ्वीराज नगर आणि अब्दुल्ला नगरचे नाव दक्ष नगर असे ठेवण्यात येईल. नैनिताल जिल्ह्यात, नवाबी रोडचे नाव अटल मार्ग असे ठेवले जाईल आणि पंचकी ते आयटीआय पर्यंतच्या रस्त्याचे नाव गुरु गोलवलकर मार्ग असे ठेवले जाईल. उधम सिंह नगरमध्ये, सुलतानपूर पट्टी नगर परिषदेचे नाव कौशल्या पुरी असे ठेवले जाईल. या नामकरणाच्या निर्णयामुळे एक नवीन ऐतिहासिक चळवळ सुरु होईल, ज्यामुळे महापुरुषांच्या योगदानाचा गौरव आणि भारतीय संस्कृतीला महत्त्व दिलं जाईल.
Leave a Reply