मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज या नावावर कोणत्याही व्यक्ती, संस्थेला किंवा कंपनीला एकाधिकाराचा हक्क नाही, असा स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे.
या चित्रपटाविरोधात एका कंपनीने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कंपनीचा दावा होता की, मांजरेकर यांनी ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि प्रचार साहित्य तयार करताना त्यांच्या मूळ संकल्पनेचा आणि साहित्याचा वापर केला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केलं की ‘छत्रपती शिवाजी महाराज’ किंवा ‘छत्रपती शिवाजी राजे भोसले’ या नावावर कोणत्याही कंपनीला वा व्यक्तीला एकाधिकाराचा दावा करता येणार नाही. हे नाव सर्व भारतीयांच्या अभिमानाशी आणि इतिहासाशी संबंधित असल्याने ते कोणाच्याही खासगी मालकीत असू शकत नाही, असं न्यायालयाने ठामपणे म्हटलं.
तसेच, मराठी चित्रपटाचे प्रेक्षक हे सुजाण आणि संवेदनशील असल्याने अशा ऐतिहासिक विषयावरील चित्रपटामुळे कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अनादर निर्माण होईल, असा दावा ग्राह्य धरता येत नाही, असंही न्यायालयाने नमूद केलं.
या निर्णयानंतर महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाला कोणतीही कायदेशीर अडचण उरलेली नाही. त्यामुळे ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ हा चित्रपट नियोजित वेळेनुसार प्रदर्शित होणार आहे. या निकालामुळे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर आधारित साहित्य, चित्रपट आणि नाटक निर्मात्यांना दिलासा मिळाला असून, न्यायालयाचा हा निर्णय सर्जनशील स्वातंत्र्याला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बळ देणारा ठरला आहे.


Leave a Reply