स्वयंघोषित “चमत्कारी डॉक्टर” मुनीर खान यांनी जाहिरात केलेल्या संशयास्पद औषध प्रकरणात अडकलेल्या डॉक्टरांना विशेष न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्ततेसाठी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.
सन २००९ मध्ये मुनीर खान यांनी “बॉडी रिव्हायव्हल” हे औषध कर्करोग, मधुमेह आणि इतर गंभीर आजारांवर खात्रीशीर उपचार असल्याचा दावा करत त्याची जाहिरात केली होती. मात्र, हे औषध घेतल्यानंतर अनेक रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याच्या तक्रारी वर्सोवा पोलिस ठाण्यात नोंद झाल्या. या पार्श्वभूमीवर खान आणि त्याच्या काही सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पाच डॉक्टरांसह खानने नियुक्त केलेल्या व्यवस्थापकांनी न्यायालयात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला होता. या याचिकेत त्यांनी असा दावा केला की, मुनीर खानने त्यांना विश्वास दिला होता की हे औषध कोणत्याही आजारावर प्रभावी ठरेल आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मात्र, विशेष न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला.
विशेष न्यायाधीश एसी डागा यांनी आपल्या निकालात नमूद केले की- रुग्ण विश्वासाने डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना योग्य निदान व उपचार मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, या प्रकरणात डॉक्टरांनी योग्य तपासणी न करता ‘बॉडी रिव्हायव्हल’ औषध रुग्णांना लिहून दिले. हे वर्तन केवळ निष्काळजीपणा नसून, फसवणुकीचा स्पष्ट हेतू दर्शवते.
खानच्या मुलाची सुटका याचिकाही नामंजूर- या प्रकरणात मुनीर खानचा मुलगा सरोश खान यानेही सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने तीही फेटाळली. न्यायालयाने याबाबत नमूद केले की, सरोश खानने बनावट प्रमाणपत्रे आणि काही राजकीय नेत्यांची शिफारसपत्रे सादर करून त्याच्या वडिलांसाठी पद्मश्री पुरस्काराची मागणी केली होती, त्यामुळे या प्रकरणात त्याची भूमिकाही संशयास्पद आहे.
या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील हाती घेतली असून, स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा न्यायालयीन तपास सुरू असून, पुढील सुनावणीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Leave a Reply