मुंबई: गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील परिचारिकांचा संप अखेर गुरुवारी संपुष्टात आला आहे. सरकारने परिचारिकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याने हा संप मागे घेण्यात आला. यापुढे ‘स्टाफ नर्स’ या पदनामाऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’ (परिचर्या अधिकारी) असे नवीन पदनाम असणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गजबे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि सचिव धीरज कुमार यांचे आभार मानले.बैठकीच्या इतिवृत्तातील नोंदीनुसार सर्व मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने आणि त्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपामुळे मुंबईतील जे. जे. रुग्णालये, कामा, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालये यांसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये नियमित शस्त्रक्रिया थांबल्या होत्या, तर केवळ अतितात्काळ शस्त्रक्रियाच सुरू होत्या. आता संप मिटल्याने आरोग्य सेवा पूर्वपदावर येतील.
मान्य झालेल्या प्रमुख मागण्या
* पदनाम बदल: ‘स्टाफ नर्स’ ऐवजी ‘नर्सिंग ऑफिसर’ (परिचर्या अधिकारी) असे नवीन पदनाम.
* वेतनश्रेणी वाढ: अधिपरिचारिका, परिसिका आणि परिचर्या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनश्रेणी वाढीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला जाईल.
* रिक्त पदांची भरती: परिचारिकांची रिक्त पदे आणि नवनियुक्त महाविद्यालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालयाकडून बिंदूनामावली तयार करून भरती प्रक्रिया सुरू केली जाईल.
* भाडे आणि गृहप्रवेश भत्ता: केंद्र शासनाप्रमाणे भाडे आणि गृहप्रवेश भत्त्यासंदर्भात प्रस्ताव मंडळापुढे सादर केला जाईल.
* पाळणाघर आणि बेझिंग रूम: पाळणाघर आणि सुसज्ज बेझिंग रूम उपलब्ध करून देण्याबाबत संचालनालय स्तरावर एका महिन्यात अंमलबजावणी केली जाईल.
* निवासस्थान: निवासस्थान मिळण्याबाबत संचालनालय स्तरावर दोन महिन्यात अंमलबजावणी केली जाईल.
* जीएनएम विद्यार्थ्यांचे विद्यावेतन: जीएनएम विद्यार्थ्यांच्या विद्यावेतन वाढीबाबत संचालनालयाकडून प्राप्त प्रस्ताव नियमानुसार कार्यवाही केली जाईल.
* संघटना कार्यालयासाठी जागा: शासनामार्फत संघटनेला जागा देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
या निर्णयांमुळे राज्यातील परिचारिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या परिचारिकांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply