श्रीलंकेतील कॅंडी शहरात ६ ते १३ सप्टेंबर २०२५ दरम्यान तिसरा न्येलेनी ग्लोबल फोरम संपन्न झाला. या परिषदेत १०२ देशांमधील ७०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, यामध्ये महिला प्रतिनिधींचे प्रमाण तब्बल ६० टक्के होते.शेतकरी संघटनांची आंतरराष्ट्रीय संस्था ला व्हिया कॅम्पेसिना आणि श्रीलंकेच्या एनपीपी सरकारच्या सहकार्याने या फोरमचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्घाटन सोहळ्यात श्रीलंकेचे व्यापार व अन्नसुरक्षा मंत्री वसंथ समरसिंघ आणि कृषी मंत्री समंथ विद्यारत्न उपस्थित होते. त्यांनी या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकास, अन्न सार्वभौमत्व आणि सहकार चळवळींना चालना मिळेल, असे सांगितले.
न्येलेनी या पश्चिम आफ्रिकेतील शेतकरी महिलेच्या नावाने या फोरमला ओळख दिली जाते. तिने आपल्या काळात पितृसत्तेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला होता. याआधी २००७ व २०१५ मध्ये माली येथे दोन फोरम्स पार पडले होते. यंदाचे फोरम मूळतः भारतात होणार होते, मात्र अडथळ्यांमुळे ते श्रीलंकेत हलवण्यात आले. भारतातून संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, युद्धवीर सिंग, डॉ. अशोक ढवळे आणि चुक्की नंजुंडस्वामी यांनी सहभाग घेतला. परिषदेत युवा, महिला आणि पॅलेस्टाईनशी एकता या विषयांवरील चर्चासत्रे झाली. तसेच २८ पानी राजकीय कृती कार्यक्रम मांडण्यात आला, ज्यात भांडवलशाही, साम्राज्यवाद, नवउदारवाद, पितृसत्ताकता, वंशवाद आणि फॅसिझम यांसारख्या प्रवृत्तींना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले.
डॉ. अशोक ढवळे यांनी सुधारणा सुचवताना सरंजामशाही आणि धर्मांधतेचाही विरोध करावा तसेच समाजवादाला पर्यायी व्यवस्था म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केली. या फोरममुळे शेतकरी व महिला चळवळींना जागतिक पातळीवर बळकट व्यासपीठ मिळाले आहे.
Leave a Reply