राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘100 दिवसात एक विकेट पडली, 6 महिने थांबा आणखी एक जाणार’, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जिल्हा बैठकीला संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधत हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्याोग करतो, त्याचा बळी जाईल. हिंमत असेल तर, समोर येऊन लढावे ही लढाई मोठी आहे. मला कधी वाटते की, बरे झाले पक्ष फुटला. जो स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्यभर राहीन. पण, नैतिकता सोडणार नाही. एक तर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते. पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणे बंद केले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढले पाहिजे. राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत, लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल, असा मोठा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या प्रकरणावर भाष्य
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा भेट द्या. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल. देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना दूरध्वनी आले होते. ही बाब मला मिळालेल्या एका माहितीतून समोर आली आहे. फोन सुरू असताना त्यांची हे गंमत पहात होते. ही खूप मोठी विकृती आहे. अवादा कंपनीला काम मिळू नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्रे दिली आहेत. पत्रही त्यांनी द्यायची आणि खंडणीही त्यांची घ्यायची, असा प्रकार आहे. हाच आकाचा तोच आका आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Leave a Reply