छत्रपती संभाजीनगर : अमेरिकन नागरिकांना कर चुकविल्याची भीती दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील चिकलठाणा औद्योगिक परिसरातील एका चार मजली इमारतीत हे अवैध कॉल सेंटर चालवले जात होते. सोमवारी मध्यरात्री १.२० वाजता टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ११६ जणांना अटक केली.
या आरोपींमध्ये एक अब्जाधीश व्यावसायिकासह वरिष्ठ व्यवस्थापक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक, टीम लीडर, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, आयटी व्यवस्थापक अशांचा समावेश आहे. बहुतांश आरोपी पदवीधर असून त्यांना अमेरिकन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करून “कर चुकविला आहे, तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते” अशी भीती दाखवली जात होती. त्यानंतर “दंड भरल्यास केस निकाली निघेल” असे सांगून मोठ्या प्रमाणात डॉलर्समध्ये रक्कम उकळली जात होती. नागरिकांची वैयक्तिक माहिती, सोशल सेक्युरिटी नंबर, आणि कराशी संबंधित बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा गैरवापर केला जात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
पोलिस तपासानुसार हे कॉल सेंटर गेल्या चार वर्षांपासून गुप्तपणे सुरू होते, आणि विविध राज्यांतील तरुणांना उच्च वेतनाचे आश्वासन देऊन कामावर ठेवण्यात आले होते. हा मोठा आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचा प्रकार मानला जात असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.


Leave a Reply