चेन्नई : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑक्सफर्ड बिग रीड या आंतरराष्ट्रीय वाचन स्पर्धेसाठी भारतासह विविध देशांतील शाळांकडून नोंदी मागविण्यात आल्या आहेत. इयत्ता 1 वी ते 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार असून नोंदी सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये विभागली असून लेव्हल 1 (इयत्ता 1 ते 3), लेव्हल 2 (इयत्ता 4 ते 6) आणि लेव्हल 3 (इयत्ता 7 ते 9) असा वर्गीकरण आहे. प्रत्येक गटासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करणे, दोन पुस्तकांचा तुलनात्मक आढावा किंवा समीक्षा लिहिणे अशा प्रकारच्या कृतीचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांना ऑक्सफर्ड रीडिंग बडी या प्लॅटफॉर्मवर एक महिन्याचे मोफत डिजिटल सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. या प्रवेशिका कल्पकता, अभिव्यक्ती, मांडणी आणि मौलिकता या निकषांवर तपासल्या जातील. राष्ट्रीय विजेत्यांना 15 हून अधिक देशांतील विद्यार्थ्यांशी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांची घोषणा 30 नोव्हेंबर रोजी होणार असून जागतिक स्तरावरील विजेते 30 डिसेंबर रोजी घोषित केले जातील. आतापर्यंत 1,600 शाळांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. शालेय पातळीवरील फेऱ्या सुरू झाल्या असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
विजेत्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून बक्षिसे, फॅबर-कॅसल आणि अॅमेझॉनचे गिफ्ट व्हाउचर्स, पदकं, प्रमाणपत्रं, टॅबलेट्स, आयपॅड्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे लेव्हल 3 मधील जागतिक विजेत्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस टीमसोबत इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. तसेच सर्व शालेय विजेत्यांना यंग वर्ल्ड क्लबचे तीन महिन्यांचे मोफत डिजिटल सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे.
Leave a Reply