पाच राज्यांचा प्रवास करून थकलेल्या गिधाडाची सुटका

रायपूर तब्बल ३,००० किमी प्रवास करणाऱ्या एका पांढऱ्या पाठीच्या गिधाडाची (N10) छत्तीसगडमध्ये सुटका करण्यात आली. रायपूरजवळील जंगल सफारीत हे थकलेले आणि तहानलेले गिधाड आढळले आणि सध्या त्याच्यावर निरीक्षण सुरू आहे. पुरेसे वजन प्राप्त झाल्यानंतर गिधाडाला पुन्हा निसर्गात मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) संचालक किशोर रिठे यांनी दिली.

ताडोबातून ३,००० किमीचा प्रवास
हे गिधाड ३ ऑगस्ट २०२४ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) उपग्रह टॅगने नोंदवले गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांमधून प्रवास करत रायपूरपर्यंत पोहोचले. मात्र, अशक्तपणा थकवा आणि तहानेने व्याकुळ झालेले ते गिधाड रायपूरजवळील जंगल सफारीत सापडले.
छत्तीसगड वन विभागाने गिधाडाला अचनकमार व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्याची योजना आखली आहे. भारतात गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांचा हा भाग असून, महाराष्ट्र वन विभाग आणि BNHSच्या संयुक्त उपक्रमात १० लांब पल्ल्याच्या गिधाडांना GPS टॅग करण्यात आले होते. हरियाणातील पिंजोर गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलेल्या या गिधाडांना ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात सोडण्यापूर्वी विशेष अवारीमध्ये ठेवण्यात आले होते.
२१ जानेवारी २०२४ रोजी ताडोबात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जटायू संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला. १९९० ते २००६ या काळात डायक्लोफेनाक या औषधामुळे मोठ्या प्रमाणावर गिधाड मृत्यूमुखी पडली. त्यामुळे गिधाड संवर्धनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या गिधाड कृती योजनेअंतर्गत २००६ मध्ये पशुवैद्यकीय क्षेत्रात या औषधावर बंदी घालण्यात आली.
हरियाणा, आसाम, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये गिधाड पुनरुत्पत्ती कार्यक्रमांमुळे संख्या हळूहळू वाढत आहे. ताडोबा आणि पेंचमध्ये नुकतेच १० पांढऱ्या पाठीच्या आणि १० लांब चोचीच्या गिधाडांचे पुनर्वसन करण्यात आले, ज्यामुळे भारताच्या गिधाड संवर्धन मोहिमेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *