मुंबई : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध सुलेखनकार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव यांनी यावर्षी एक अनोखा प्रयोग साकारला आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने नवरात्रीसाठी खास नऊ पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली असून, या पोस्टकार्ड्सना सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्श देण्यात आला आहे.
या पोस्टकार्ड्सची शब्दरचना रुपाली ठोंबरे, संकल्पना व सुलेखन अच्युत पालव यांचे असून, मांडणी श्रद्धा पालव यांनी केली आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एक पोस्टकार्ड सार्वजनिकरित्या शेअर करून सणाचा उत्सव अधिक आनंददायी करण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे. “दररोज एक कार्ड आपण शेअर करणार आहोत. तुम्हाला आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवाराला पाठवा,” असे आवाहन पालव यांनी यावेळी केले.
नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते. त्या प्रत्येक रूपाचे दर्शन घडविणारी ही कार्डे कला, संस्कृती आणि श्रद्धा यांचे सुंदर मिश्रण असल्याचे पाहायला मिळते. पालव यांची सुलेखनकला आणि शब्दरचनेचा संगम यातून उत्सवाची वेगळीच झलक दिसते.
ही कार्डे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य टपाल कार्यालयांतून ती विकत घेता येतील. त्यामुळे नवरात्रीचे हे विशेष पोस्टकार्ड्स सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणार आहेत. सणाच्या निमित्ताने अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून भक्ती आणि परंपरेचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. अशा नव्या संकल्पना आणि कलेच्या माध्यमातून नवरात्रीचा उत्सव अधिक समृद्ध करण्याचे कार्य पालव करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply