अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. पाकिस्तानकडून भूमिगत अणवस्त्र चाचण्या केल्या जात असून त्यामुळे भूकंपांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते रविवारी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ट्रम्प म्हणाले, “रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश सातत्याने अणवस्त्र चाचण्या करत आहेत. मात्र, अमेरिका एकमेव देश आहे जो चाचणी करत नाही. मला असा एकमेव देश बनायचं नाही जो चाचण्या करत नाही.” त्यांनी स्पष्ट संकेत दिले की, अमेरिका पुन्हा अणवस्त्र चाचण्या सुरु करणार आहे.
रशियाच्या पोसाइडन अंडरवॉटर ड्रोनच्या अणवस्त्र चाचणीवर प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले, “रशिया आणि चीन अणवस्त्र चाचण्या करतात, पण त्याबाबत बोलत नाहीत. मात्र, आपण खुल्या समाजात जगतो, त्यामुळे या विषयावर चर्चा करावीच लागेल.” त्यांनी पुढे म्हटलं की, “जर ते चाचणी करत असतील, तर आम्हीही करणार.”
ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिकेकडे जगाला १५० वेळा उडवण्यापुरती अणवस्त्र क्षमता आहे. “रशियाकडेही मोठ्या प्रमाणात अणवस्त्र आहेत, चीनकडे त्याहून अधिक,” असे ते म्हणाले.
अमेरिकेने मागील तीन दशकांपासून अणवस्त्र चाचणी थांबवली आहे. परंतु ट्रम्प यांच्या या विधानानंतर अमेरिका पुन्हा अणवस्त्र चाचणी सुरु करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे जागतिक स्तरावर आण्विक स्पर्धेची भीती पुन्हा डोकावत आहे.
ट्रम्प यांच्या या दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर चिंता व्यक्त होत असून, या नव्या अणवस्त्र स्पर्धेमुळे जागतिक सुरक्षेला मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.


Leave a Reply