गोव्यात भ्रष्टाचार नव्हे, लूट सुरू आहे! भाजपच्या माजी मंत्र्यांचा खळबळजनक आरोप

गोव्यातील भाजप सरकारवर आधीच विरोधक टीका करत असताना, आता भाजपच्या माजी मंत्र्यानेच सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. एक सरकारी फाईल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ ते २० लाख रुपयांची लाच एका मंत्र्याला दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला आहे. राज्यातील मंत्री केवळ पैसे मोजण्यात व्यस्त आहेत, असा घणाघात करत त्यांनी भ्रष्टाचार नव्हे, तर सरळसरळ लूट सुरू असल्याचा आरोप केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात आल्यावर मडकईकरांनी त्यांची भेट घेतली. २०२७च्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मडकईकरांनी तिकीटाच्या मागणीसाठी ही भेट घेतल्याचे सांगितले. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. माझी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत २०२२ मध्ये भाजपने मला तिकीट दिले नाही. मात्र, लवकर बरे व्हा आणि तुम्हाला योग्य पद दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.

भाजप पुन्हा सत्तेत आले आणि मला पूर्णपणे विसरले. म्हणूनच मी आज उत्तर मागायला आलो, असे मडकईकर म्हणाले. भाजपकडून मला पुढील आठवड्यापर्यंत उत्तर मिळेल, असे सांगण्यात आले आहे. जर तिकीट नाकारले, तर मी पक्षात राहायचे की नाही, याचा विचार करेन. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसारखे पक्ष माझ्या संपर्कात आहेत. मी योग्य वेळी निर्णय घेईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मडकईकरांनी राज्यातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. या सरकारमध्ये काहीच व्यवस्थित चाललेले नाही. मंत्री फक्त पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. एक फाईल मंजूर करण्यासाठी मला एका मंत्र्याला तब्बल १५ ते २० लाख रुपये द्यावे लागले हे भ्रष्टाचार नव्हे, तर लूट सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनता या सरकारला हटवण्यासाठी उत्सुक आहे. जनतेचा संयम सुटला आहे. सरकारवर विश्वास राहिलेला नाही. भाजपने आता निर्णय घ्यावा, अन्यथा मी माझा मार्ग ठरवेन; असे मडकईकर म्हणाले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *