नवी मुंबईतील एका नामांकित शाळेत अवघ्या चार वर्षांच्या विद्यार्थ्यावर शाळेच्या व्हॅन चालकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक घटनेने पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात शेकडो संतप्त पालकांनी सोमवारी सकाळी शाळेबाहेर जोरदार निदर्शने करत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आणि कठोर कारवाईची मागणी केली. ही धक्कादायक घटना २२ एप्रिल रोजी घडली होती. पोलीसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान पालकांनी निषेध फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली, तर काही पालकांनी काळ्या फिती बांधून शांततापूर्ण निषेध नोंदवला. यावेळी अनेक पालकांनी मुख्याध्यापकांना तात्काळ पदावरून हटवण्याची जोरदार मागणी केली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एका पालकाने शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. त्यांनी सांगितले की, “प्रकरण गंभीर असूनही प्रशासनाकडून कुठलीही ठोस आश्वासनं मिळालेली नाहीत. अशा भयंकर घटना पुन्हा घडणार नाहीत याची आम्ही खात्री कशी मानायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी शाळा प्रशासनाकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शाळेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या प्रकारामुळे परिसरात संतापाचा उद्रेक झाला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Leave a Reply