मुंबई : ब्राह्मण समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. अजित पवार गटाचे आशिष दामले हे या महामंडळाचे अध्यक्ष असून मंगळवारी नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय काढला. महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याच्या अखत्यारीबाबत सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागासवर्गीय कल्याण विभाग यांच्यात वाद निर्माण झाला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हा महामंडळ नियोजन विभागाच्या अखत्यारीत राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती.
शासन निर्णयानुसार अध्यक्षांना मानधन, बॅकिंग भेटी, दूरध्वनी खर्च, वाहनाची सुविधा यांसह स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी एक स्टेनो टायपिस्ट, दोन लिपिक आणि एक शिपाई अशी मनुष्यबळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. इतर सर्व समाजांमध्ये अध्यक्षांना मंत्रिपदाचा क्रमांक स्थान असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा महामंडळ ३ ऑक्टोबर २०२४ रोजी स्थापन करण्यात आला होता, तर आशिष दामले यांची १६ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. विधानसभेतील निवडणुकीपूर्वी सरकारने तब्बल १५ महामंडळे स्थापन केली होती; मात्र परशुराम महामंडळाव्यतिरिक्त अद्याप इतर कोणत्याही महामंडळाला अध्यक्ष मिळालेला नाही.
राज्य सरकारने यापूर्वीच २० ऑगस्ट रोजी सहा सनदी अधिकाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच संचालकांच्या राजकीय नियुक्त्या होतील, तोपर्यंत हे अधिकारी कार्यरत राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Leave a Reply