“पार्सियाना”, एक प्रसिद्ध पारशी मासिक ६० वर्षांनंतर बंद होणार

मुंबईच्या फोर्ट भागातील एका जुन्या निओ-गॉथिक इमारतीत, जी आता जीर्ण झाली आहे, तिथे चालतं देशातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या पारशी मासिकांपैकी एक – “पार्सियाना”. माझ्या आणि सुमेधाच्या “इंडियन एक्सप्रेस”मधील ज्येष्ठ सहकारी मिसेस वकील यांच्यामुळे आम्हाला “पार्सियाना” ची खरी ओळख झाली होती. शिवाय या मासिकाचे संपादक जहांगिर पटेल हे सुमेधाचे सेंट झेवियर्स कॉलेज मधील पत्रकारितेचे शिक्षक, त्यामुळे या मासिकाबद्दल एक आत्मीयता. पण आता सलग सहा दशके प्रबोधनाचे काम करून हे मासिक बंद होणार आहे. त्याचे दुःख वाटते.
हे मासिक १९६४ मध्ये पेस्टनजी वॉर्डन यांनी सुरू केलं होतं. वॉर्डन हे व्यावसायिक डॉक्टर होते, शिवाय चंदनाच्या व्यापारातही होते. त्यांनी मुंबईतील पारशी समाजाच्या घडामोडी नोंदवून ठेवाव्यात, यासाठी हे मासिक काढलं.
त्यानंतरच्या काळात “पार्सियाना”ची लोकप्रियता आणि वाचकसंख्या वाढत गेली. जगभर विखुरलेल्या आणि हळूहळू संख्येने घटणाऱ्या पारशी समाजासाठी हे मासिक एक समाजाशी जोडून ठेवणारे माध्यम ठरलं.
मात्र, आता, हे मासिक ऑक्टोबरमध्ये बंद होणार आहे. कारण, घटती वाचकसंख्या, आर्थिक अडचणी आणि पुढे मासिक चालविण्यासाठी उत्तराधिकारी नसणे.
ही बातमी समजल्यापासून केवळ वाचकच नव्हे तर या मासिकाच्या वारशाबद्दल माहिती असलेले अनेक जण व्यथित झाले आहेत.

“हे म्हणजे एका युगाचा शेवटच आहे,” असं १८ वर्षीय विद्यार्थी सुशांत सिंग सांगतो. “आम्ही नेहमी गंमत करत होतो की ‘पार्सियाना’बद्दल माहिती नसेल किंवा त्याबद्दल दोन शब्द जो बोलू शकत नाही, तो खरा पारशीच नाही!”

ऑगस्ट महिन्याच्या अंकातील संपादकीयातून मासिक बंद होणार असल्याची घोषणा होताच, वाचकांकडून जगभरातून ई-मेल , पत्रांचा ओघ सुरु झाला.

सप्टेंबरच्या चालू अंकात मुंबईतील एका वाचकाने लिहिलं, “इतक्या छोट्या समुदायाचा इतिहास एवढ्या मेहनतीने आणि उत्कटतेने लिहून ठेवणं हे अवघड काम होतं. पण ‘पार्सियाना’ने हे काम उत्तमपणे केलं.”

पाकिस्तानातील एका वाचकाने लिहिलं, हे मासिक “फक्त एक प्रकाशन नव्हतं, तर झोराष्ट्रियन समाजाला जगभरात जोडून ठेवणारा एक पूल होतं.”

वॉशिंग्टनमधील एका वाचकाने कौतुक केलं की मासिकाने समाजातील वादग्रस्त विषयांवर वास्तववादी दृष्टिकोन ठेवून माहिती दिली.

८० वर्षीय जहांगिर पटेल यांनी १९७३ मध्ये केवळ “एका रुपयाला” हे मासिक विकत घेतलं आणि त्याचं नेतृत्व केलं. ते सांगतात, “मला हे केवळ एक पत्रकारितेचं साधन हाती असावं असंच वाटत होतं.”
सुरुवातीला वॉर्डन यांनी हे मासिक मासिकरूपात काढलं होतं, ज्यात मुख्यत्वे पारशी लेखकांची लेखनं किंवा वॉर्डन यांच्या वैद्यकीय नोंदी छापल्या जात.
पण पटेल यांनी ते हाती घेतल्यानंतर ते पंधरवड्याचं मासिक बनवलं. त्यांनी पत्रकार नेमले, त्यांना प्रशिक्षित केले. शिवाय वर्गणीदारांवर आधारित मॉडेल सुरू केलं आणि कृष्णधवल मासिकाला रंगीत रूप दिलं.

“पार्सियाना”ने समाजातील चांगल्या गोष्टी, सामाजिक-धार्मिक कार्यक्रम आणि नवीन पारशी संस्थांचंही वृत्तांत दिलं. यावर्षी मे महिन्यात या मासिकाने मुंबईतील अलपैवाला म्युझियमच्या उद्घाटनाचं वृत्त दिलं, जे जगातील एकमेव पारशी संग्रहालय आहे.

आता ६०-७० वयोगटातील १५ जणांचा संपादकीय विभाग, ज्यांनी पटेल यांच्यासोबत पत्रकारिता केली आहे, तेही मासिकाबरोबरच आपली कारकीर्द थांबवणार आहेत.

“थोडा थकवा आहे आणि दुःखही आहे,” बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीत पटेल म्हणाले, “आम्ही खूप काळापासून हे काम करत आलो आहोत…. आता थांबायची वेळ आलीय ”
जुनी अंकं आणि पोपडे उडालेल्या भिंतींनी भरलेलं त्यांचं कार्यालय एका जुन्या पारशी रुग्णालयात आहे, जे गेल्या चार दशकांपासून रिकामं आहे.

पटेल सांगतात की, मासिकाचा शेवटचा दिवस, विशेष असा काही ठरवलेला नाही. मात्र पुढील अंकांत ‘पार्सियाना’च्या प्रवासाची आठवण करून देणारे विशेष लेख प्रकाशित केले जातील.

सर्व संपादकीय कर्मचाऱ्यांसाठी कदाचित कार्यालयात एकत्र जेवण ठरेल. पण केक नाही कापणार,
कारण, हा आनंदाचा प्रसंग नाही,” पटेल जड अंतकरणाने बोलून गेले. त्यावेळी सह-अनुभूतीने मन भरून आले…
मला असे वाटते , मुद्रित माध्यमात काम केलेल्या किंवा एकूणच पत्रकारितेबद्दल प्रेम असलेल्या मंडळींनी या संपादक मंडळाला, त्यातील वयोवृद्ध पत्रकारांना जास्तीत जास्त भेटावं, त्यांचे अनुभव सोशल मीडियावर प्रसिद्ध करावेत.सलग ६० वर्षे सामाजिक जागृतीसाठी सुरु असलेल्या या कामाचे कौतुक झाले पाहिजे. मुख्य म्हणजे, पारशी समाजाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान लक्षात ठेऊन, आपण या बंद पडत असलेल्या संस्थेचे अखेरचे क्षण जर आनंददायक करू शकलो, तर ती पारशी समाजाच्या कामगिरी विषयी व्यक्त केलेली प्रामाणिक कृतज्ञता ठरेल.

महेश म्हात्रे
महाराष्ट्र रिसर्च सेंटर

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *