नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला असून, येत्या 25 डिसेंबरपासून नियमित उड्डाणांना प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. आता पहिल्या टप्प्यात विमानतळ मर्यादित कालावधीत म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांपर्यंतच कार्यरत राहणार आहे. या कालावधीत दररोज २३ एअर ट्रॅफिक मुव्हमेंट्स हाताळल्या जाणार आहेत.
पहिले प्रवासी विमान इंडिगोचे (6E460) असून, २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता बेंगळुरूहून नवी मुंबईत दाखल होईल. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता इंडिगोचे 6E882 हे विमान हैदराबादकडे रवाना होईल. ही NMIA वरील पहिली अधिकृत प्रवासी ‘निर्गमन’ सेवा मानली जाणार आहे. लाँच फेजमध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर यांच्या उड्डाणांमुळे नवी मुंबईतून देशातील १६ प्रमुख शहरांना जोडले जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली असून, सीआयएसएफचा ताफा २९ ऑक्टोबर २०२५ रोजी औपचारिकरीत्या तैनात करण्यात आला आहे. सुरुवातीला विमानतळ दर तासाला सुमारे १० एअर ट्रॅफिक मुव्हमेंट्स हाताळू शकणार आहे.
फेब्रुवारी २०२६पासून NMIA पूर्ण क्षमतेने २४ तास कार्यरत राहणार आहे. त्या वेळेस दररोजच्या उड्डाणांची संख्या वाढून ३४ वर जाणार असून, अधिक विमान कंपन्या येथे सेवा सुरू करतील अशी अपेक्षा आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आधीच दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या महानगरांसाठी उड्डाणांची घोषणा केली आहे. तसेच इंडिगोनेही पहिल्या दिवसापासून १५ शहरांना जोडणाऱ्या ३६ उड्डाणांची माहिती दिली होती. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगरातील हवाई वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Leave a Reply