पालघर : उत्तर कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था आता गंभीर स्वरूप धारण करत असून यामुळे विकासाची गती थांबली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अॅग्रीकल्चर फाऊंडेशनने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवले आहे. हे निवेदन केवळ एक पत्र नसून संपूर्ण पालघर जिल्हा आणि उत्तर कोकणातील नागरिकांच्या वेदनेचा आवाज असल्याचं संघटनेने नमूद केलं आहे.
या निवेदनात अहमदाबाद महामार्गावरील दहिसर- बोईसर मार्ग, तसेच वाडा-मनोर आणि वाडा-भिवंडी राज्य महामार्गांची अत्यंत दयनीय अवस्था अधोरेखित करण्यात आली आहे. औद्योगिक, कृषी आणि पर्यटन क्षेत्रासाठी हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या स्थितीत दिवसेंदिवस बिघाड होत आहे. खोल खड्डे, तुटलेले डिव्हायडर्स, उखडलेला पृष्ठभाग आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे.
पावसाळ्यात रस्त्यांचे भाग वाहून जात असल्याने प्रवास अक्षरशः अशक्य होतो. परिणामी वाहनांच्या दुरुस्तीवरील खर्च, इंधनाची नासाडी, वाढलेला प्रवास वेळ आणि अपघातांची संख्या वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम उद्योग, शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर होत असून स्थानिक उद्योगांना मालवाहतुकीत अडथळे येत आहेत, तर शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.
संघटनेने निवेदनात नमूद केले आहे की, स्थानिक स्तरावर अनेक वेळा तक्रारी आणि पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनातील दुर्लक्ष आणि संवेदनशीलतेचा अभाव स्पष्ट दिसून येतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशात महामार्ग विकासात मोठी झेप घेतली असली तरी महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या भागाकडे लक्ष देणं अत्यावश्यक असल्याचं संघटनेने स्पष्ट केलं आहे. दहिसर- बोईसर, वाडा-मनोर आणि वाडा-भिवंडी महामार्गांचे दुरुस्तीकरण, पुनर्बांधणी आणि रुंदीकरण तातडीने करण्यात यावं, अशी मागणी संघटनेने केली आहे.
उत्तर कोकणच्या विकासाची गुरुकिल्ली रस्त्यांत दडलेली असून, या रस्त्यांचीच अवस्था आज धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने या निवेदनाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply