अहमदाबाद: गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात नडियाद (गुजरात) येथील महादेव तुकाराम पवार (वय ६८) आणि आशा महादेव पवार (वय ६०) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावचे रहिवासी होते आणि लंडन येथे आपल्या मुलाकडे जाण्यासाठी निघाले होते. या घटनेने सांगोला आणि नडियाद परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महादेव पवार आणि आशा पवार हे दोघेही नडियाद येथील एका कापड मिलमध्ये काम करत होते आणि सध्या ते निवृत्त झाले होते. आपल्या मुलाला भेटण्यासाठी ते लंडनला जाण्यास निघाले होते. दुपारी त्यांचा मुलगा दीपक पवार दोन नात त्यांना अहमदाबाद विमानतळावर सोडायला गेले होते.
अहमदाबाद विमानतळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण केले, 185 आणि 186 असे त्यांचे सीट नंबर होते. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर आदळले आणि त्यात भीषण आग लागली. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. पवार दाम्पत्याच्या निधनाची बातमी हातिद गावात येताच सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक मुलगी आणि दोन मुलं आणि नातवंडे आहेत. त्यांचा एक मुलगा गुजरात येथे चालक म्हणून काम करतो तर दुसरा मुलगा लंडन येथे वास्तव्यास आहे. पवार दाम्पत्य आपल्या लंडन येथील मुलाकडे जात होते. वृद्धापकाळात मुलाकडे जाण्याच्या त्यांच्या स्वप्नाचा अशाप्रकारे अंत झाल्याने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लंडनला जायच्या आदी दोघेही 15 दिवसआधी भावांना भेटायला हतीद या मूळगावी आले होते. घटनेची माहिती मिळताच हतीद गावचे महादेव पवार यांचे नातेवाईक अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Leave a Reply