मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. परप्रांतीय लोकांना मारहाण आणि धमकावल्याच्या प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी आपली याचिका मागे घेत राज ठाकरेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
याचिकेतील प्रमुख मागण्या
* राज ठाकरेंच्या भाषणांवर बंदी: राज ठाकरेंना सार्वजनिक ठिकाणी भाषण देण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
* मनसेची मान्यता रद्द करा: समाजात द्वेष आणि शत्रुत्व पसरवल्याबद्दल मनसेची राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी.
* पोलिस संरक्षणाची मागणी: सुनील शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात आली आहे.
याचिकेतील आरोप
याचिकेत म्हटले आहे की, ६ ऑक्टोबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता मनसे आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या सुमारे ३० कार्यकर्त्यांनी सुनील शुक्ला यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबियांना कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन आले होते. त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आणि १० महिने पाठपुरावा केला, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
तसेच, भारतीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५९ नुसार या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
Leave a Reply