बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या महापालिका प्रस्तावाला नागरिकांतून तीव्र विरोध होत असतानाच, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर हस्तक्षेप करत महापालिकेला जाहिरात रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वाऐवजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्याचा आणि केवळ महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना अंतर्गतच रुग्णसेवा देण्याचा सल्ला प्रशासनाला दिला आहे.
महापालिकेच्या विद्यमान सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरणात या दोन्ही योजना आधीच समाविष्ट असल्या तरी, जर रुग्णालय केवळ या योजनांपुरते मर्यादित ठेवले गेले, तर कोणतीही संस्था पुढाकार घेण्यास इच्छुक राहणार नाही, अशी अडचण महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महापालिका आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोयल यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आर-मध्य विभागात आयोजित केलेल्या चौथ्या आढावा बैठकीत सहभागी होत विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत आमदार संजय उपाध्याय, योगेश सागर, मनिषा चौधरी, अतुल भातखळकर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी क्षीरसागर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना गोयल यांनी स्पष्ट केले की, भगवती रुग्णालयाचे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. PPP तत्वावर रुग्णालय चालवण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेली जाहिरात आमदार मनिषा चौधरी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गोयल यांच्याकडे ही बाब मांडली. त्यानंतर गोयल यांनी आयुक्तांना जाहिरात रद्द करून नवीन धोरणासह सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, हे रुग्णालय महात्मा फुले योजना आणि आयुष्मान भारत योजना यांच्या अधीन राहून चालवले गेले पाहिजे. यामुळे पिवळ्या व भगव्या रेशनकार्डधारकांना मोफत आरोग्यसेवा तर इतर नागरिकांना २५ ते ५० टक्के सवलतीत उपचार मिळू शकतील.
यावेळी गोयल यांनी आणखी माहिती देताना सांगितले की, मागाठाणे येथे १००० खाटांचे बहुविशिष्ट रुग्णालय उभारण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात ४०० आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ६०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच कांदिवलीतही १००० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून, येथेही आयुष्मान भारत योजना राबवली जाणार आहे. याशिवाय गोराई येथील दोन प्रसूतीगृहांच्या जागी नवीन रुग्णालय उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.


Leave a Reply