मुंबई: कल्याणमधील गोळवली परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस यशवंत भीमराव आंबेडकर आणि प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या मालकीचा भूखंड बिल्डरने बळकावला होता. या अतिक्रमित जमिनीवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून, हा भूखंड कायदेशीररित्या आंबेडकर वारसांना परत करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
अतिक्रमणांविरोधात ही एक ‘आदर्श कार्यपद्धती’ (Ideal Procedure) असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले.
अतिक्रमणाची आणि कारवाईची प्रक्रिया
बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले की, गोळवली येथील जागा ‘ललित महाजन’ आणि ‘तनिष्कारे सिडन्सी’ या बिल्डरने अनधिकृतरित्या ताब्यात घेतली होती. या जागेवर ७२ सदनिका (फ्लॅट्स) आणि आठ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम उभारण्यात आले होते. राज्य सरकारने या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करत, ती संपूर्ण जागा रिकामी केली आणि सर्व बांधकामे जमीनदोस्त केली. त्यानंतर हा भूखंड यशवंत भीमराव आंबेडकर आणि प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या नावे परत करण्यात आला. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे.
अतिक्रमणांसाठी कठोर धोरण आणि अधिकाऱ्यांवर कारवाई
या जमिनीचे रक्षण करण्याची जबाबदारी मालकाची असली तरी, अतिक्रमण प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अतिक्रमण प्रकरणात सहभागी असलेल्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. अशा दोषींवर कारवाई करण्यासाठी आणि आवश्यक कायदेशीर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बावनकुळे यांनी कठोर इशारा दिला की, डॉ. आंबेडकर कुटुंबीयांची ही जमीन कोणत्याही स्थितीत अन्य कोणालाही वापरता येणार नाही. तसे झाल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी डोंबिवलीतील जमिनीवर भूमाफियांनी ताबा घेतल्याबाबत प्रश्न विचारला होता. महसूल मंत्र्यांनी याच संदर्भात वरील माहिती दिली.
Leave a Reply