मुंबई : मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर आणि ठाणे या शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, यामुळे उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महामुंबईत हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीए (महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार आहे.
या प्रकल्पांतर्गत एका पॉडकॅबमध्ये सुमारे २० प्रवासी बसू शकतात आणि ती ताशी ६० ते १०० किलोमीटर वेगाने धावू शकते. पॉड टॅक्सी रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता वरून धावेल, त्यामुळे वाहतूक कोंडी टळेल. इंजिनलेस इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरीवर आधारित या वाहनांमुळे कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॉड टॅक्सी ही शहरी वाहतुकीतील भविष्यातील क्रांतिकारी पायरी ठरणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले. “मीरा-भाईंदर आणि ठाण्यातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होईल, तसेच पर्यावरणालाही मदत होईल,” असे ते म्हणाले.
बोरिवलीत प्रायोगिक स्तरावर हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता उपनगरात सुमारे १५ किलोमीटर अंतरासाठी हा प्रस्ताव पुढे सरकला आहे. विशेष म्हणजे, पॉड टॅक्सी स्टेशन लहान जागेत उभारता येतात, त्यामुळे जमिनीचा अपव्यय कमी होतो आणि मोठे बांधकाम टळते.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, डीपीआर पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बांधकामाला सुरुवात केली जाईल. यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रकल्प महानगर प्रदेशात इतर ठिकाणीही विस्तारला जाण्याची शक्यता आहे. नागरिकांना जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवास देणारा हा प्रकल्प मुंबई उपनगरांच्या वाहतुकीला नवा वेग देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply