तुळजापूर: येथील एका धक्कादायक घटनेत, एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि विशेषतः पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही तुळजापूर येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी होती. तिने शहरातील पोलीस वसाहत, एसटी कॉलोनी येथील राहत्या घरात गळफास घेतली. माझ्यासोबत लग्न कर अन्यथा सोशीलमीडियावर तुझी बदनामी करेन, आरोपीने अशी धमकी दिल्याने तिने हा मोठा पाऊल उचलल्याचे तिच्या आईने तक्रारीत सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मुलीच्या आईची तक्रार
याप्रकरणी मुलीच्या आईने 10 जून रोजी तुळजापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार कांबळे आणि नगिना शशिंकात पांडागळे (दोघे रा. काक्रबा ता. तुळजापूर जिल्हा, धाराशिव) यांच्या विरोधात तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता.कलम- 107,351(3), 3(5) अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार कांबळे याच्यावर यापूर्वीही सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करणारा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरात आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये मोठा शोककळा पसरली आहे. पोलीस कॉन्स्टेबलचे कुटुंब आणि त्यांचे सहकारी या घटनेने सुन्न झाले आहेत. तरुणीच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण आहे की अन्य काही, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे समाजात, विशेषतः युवा पिढीमध्ये वाढत्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तुळजापूर शहरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Reply