ई-बाईक टॅक्सी सेवेसाठी धोरण जाहीर; १५ किमी प्रवास मर्यादा, सीट सेपरेटर सक्तीची

राज्य सरकारने शहरांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर जवळपास तीन आठवड्यांनी गृह विभागाने या सेवेसाठी विस्तृत मार्गदर्शक धोरण जाहीर केले आहे. या नव्या धोरणानुसार, प्रत्येक प्रवासाची कमाल मर्यादा १५ किलोमीटर ठरवण्यात आली असून, प्रवासाचे भाडे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करणार आहे.

या धोरणाखाली फक्त इलेक्ट्रिक दुचाकींनाच टॅक्सी सेवेसाठी परवानगी दिली जाईल. पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना परवानगी मिळणार नाही.

चालकांसाठी अटी आणि पात्रता
• चालकांकडे वैध चालक परवाना असणे आवश्यक आहे.
• चालकांनी ओळखपत्रासह बॅच घालणे बंधनकारक आहे.
• वयाची मर्यादा २० ते ५० वर्षे ठेवण्यात आली आहे.
• चालकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे आणि दिवसाला अधिकतम आठ तास सेवा द्यावी लागेल.

प्रवासी सुरक्षेसाठी विशेष नियम
• प्रत्येक दुचाकीवर फक्त एकच प्रवासी बसू शकेल.
• १२ वर्षांखालील मुलांना पाठीमागे बसण्यास परवानगी नाही.
• चालक व प्रवाशामध्ये सीट सेपरेटर असणे सक्तीचे आहे.
• पावसाळ्यात पावसापासून संरक्षण करणारे कव्हर असणे बंधनकारक.

सेवा पुरवठादारांसाठी नियम
• राज्यस्तरीय परवाना मिळवण्यासाठी किमान ५० ई-बाईक्स असणे आवश्यक.
• परवाना पाच वर्षांसाठी वैध राहील.
• प्रत्येक दुचाकीला वैध नोंदणी, विमा व तांत्रिक पात्रता प्रमाणपत्र असावे.
• सेवा मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
• अ‍ॅग्रीगेटर्सनी चार्जिंग सुविधा आणि टॅक्सी स्टँड्स विकसित करणे बंधनकारक.

महिलांसाठी विशेष तरतुदी
• अ‍ॅग्रीगेटर्सनी त्यांच्या फ्लीटमध्ये महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्प्याने ५०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
• प्रवाशांसाठी महिला चालक निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की, नोंदणीकृत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना ई-बाईक टॅक्सी परवाना घेण्यासाठी १०,००० रुपयांचे अनुदान दिले जाईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *