बीडमध्ये एका खासगी शिकवणी वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील उमाकिरण क्लासेसमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकांनीच विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात विजय पाटील आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र आता, आरोपी विजय पाटील आणि प्रशांत खाटोकर यांचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या फोटोंमुळे विरोधकांना मुंडेंवर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे. या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे बीडचे राजकारण आणखीच तापले आहे. या प्रकरणाच्या तपासाची मागणी होत असतानाच, आता या व्हायरल फोटोंमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सत्य काय आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल, पण सध्या तरी या फोटोंनी बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.
एसआयटी चौकशीची मागणी
मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांना हे सर्व प्रकरण सांगितल्याचे आणि एसआयटी नेमूनच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे आता आरोपीसोबत मुंडे यांचे फोटो समोर आल्याने पुन्हा यावर चर्चा होत आहे.
Leave a Reply