गुवाहाटी : असमचे प्रख्यात गायक व संगीतकार जुबीन गर्ग यांचा शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार मंगळवारी सोनापूरजवळील कामरकुची गावात करण्यात आला. गुवाहाटीपासून सुमारे 30 किमी अंतरावर झालेल्या या अंत्ययात्रेला लाखो चाहत्यांनी हजेरी लावली.
गर्ग यांच्या मृतदेहाला रविवारी सिंगापूरहून नवी दिल्लीमार्गे गुवाहाटीत आणण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 48 तासांहून अधिक काळ त्यांचे पार्थिव अर्जुन भोगेश्वर बरुआ क्रीडा संकुलात दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा कामरकुचीकडे रवाना झाली. मार्गभर “जॊई जुबीन दा” च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.
अंत्यसंस्कारावेळी चाहत्यांनी गर्ग यांचे लोकप्रिय गाणे मायाबिनी सामूहिकपणे गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या बहिणी पाम्ले बोरठाकुर आणि शिष्य संगीतकार राहुल गौतम शर्मा यांच्या हस्ते पार्थिवाला अग्नी देण्यात आला. या वेळी शासकीय सन्मान म्हणून 21 तोफांची सलामीही देण्यात आली. विशेष म्हणजे, गर्ग यांनी अनेकदा आपल्या चाहत्यांना मृत्यूनंतर मायाबिनी हे गाणे वाजवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
याआधी सकाळी गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालयात अखेरचा पोस्टमार्टम करण्यात आला. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत झालेल्या या तपासणीत मृत्यूचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न झाला. याआधी सिंगापूरमध्ये 19 सप्टेंबर रोजी, मृत्युदिनीच, प्राथमिक तपासणी झाली होती. त्यात पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, चाहत्यांच्या मागणीनुसार दुसरा शवविच्छेदन करण्यात आला. कारण अनेकांना शंका होती की आजारी असतानाही डॉक्टरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून गर्ग यांना पोहण्यासाठी भाग पाडण्यात आले. जुबीन गर्ग यांच्या निधनाने असमसह ईशान्य भारतातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.
Leave a Reply