पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर गंभीर इशारा दिला आहे. नेपाळमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांनी सत्ता उलथवून टाकली, तसाच उद्रेक भारतातही होऊ शकतो, असे ते म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी पीएचडी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला समर्थन दर्शवले. विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत असूनही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही, असे त्यांनी सांगितले. मंत्रालयासमोर शांततेत ठाम आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आंबेडकर म्हणाले, “सध्याचे राज्यकर्ते घाबरले आहेत. जर शासनाने सुधारणा केल्या नाहीत, तर दोन महिन्यांत भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते.” केंद्र सरकारच्या अमेरिकेसोबतच्या व्यापार धोरणावरही त्यांनी टीका केली. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लादल्यास भारतातील उद्योगांवर मोठा परिणाम होईल.
यामुळे टेक्स्टाईल क्षेत्रात सुमारे 1.10 कोटी कामगार, तसेच गुजरातमधील जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रातील 10 लाख कर्मचारी बेरोजगार होऊ शकतात. आयटी क्षेत्रातही बेरोजगारी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हे राजकीय आरोपांपलीकडे जाऊन सध्याच्या आर्थिक व सामाजिक स्थितीवरील गंभीर इशारा मानला जात आहे. तरुणाई व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर असंतोष उफाळून येऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
–
Leave a Reply