मुंबईमध्ये बाळाच्या जन्मापूर्वीच सौदा, सहा दिवसांच्या अर्भकाची साडेपाच लाख रुपयांत विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळला आहे. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी नगर परिसरात लहान बालकांची विक्री होत असल्याची माहिती एका २४ वर्षीय तक्रारदाराने पोलिसांना दिली. समीर नावाचा व्यक्ती लहान मुलांची विक्री करत असल्याचे त्याने सांगितले. तक्रारदाराने समीरसोबत संपर्क साधला. त्यावेळी एका महिलेची प्रसूती एका महिन्यावर असून ती चार लाख रुपयांत तिच्या बाळाची विक्री करणार असल्याचे समीरने सांगितले. या व्यवहारासाठी समीरने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची आगाऊ मागणी केली. तक्रारदाराने त्याला १० हजार रुपये दिले आणि त्यानंतर ते दोघे सतत संपर्कात होते.
६ ऑगस्ट रोजी समीरने तक्रारदाराला फोन करून मुलगा झाल्याचे सांगितले आणि बाळासाठी साडेपाच लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचून ठरल्याप्रमाणे बाळाची डिलिव्हरी होण्यापूर्वीच शिवाजी नगर येथे सापळा रचला. दोन महिला एक बाळ घेऊन लोटस जंक्शन येथे आल्या. त्यांनी बाळाची कागदपत्रे दाखवून साडेपाच लाखांची मागणी केली. पोलिसांनी गोवंडी येथील नाजिमा असलम शेख उर्फ नसरीन (३९) आणि फातिमा महमुदअली शेख यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान नसरीनने हे बाळ सुझान खान हिचे असल्याचे सांगितले आणि समीर उर्फ नबील शेख याने विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. या विक्रीतून मिळालेल्या पैशांचे वाटप बाळाचे आई-वडील, आरोपी समीर, त्याचे साथीदार आणि नसरीन यांच्यात होणार होते. नसरीनने यापूर्वी देखील बालकाची विक्री केली असून, तिच्याविरुद्ध गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Reply