”गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलरांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीच्या मेट्रो स्टेशनचा पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहे.ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या, दुर्दैवाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा गाड्यांची गती कमी झाली तर अंधेरी, घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन प्रवाशांना बाहेर काढणे, तसेच अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत एक आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. वांद्रे येथील एमएमआरडीए कार्यालयात मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील मान्सूनपूर्व कामांबाबत आढावा बैठक घेतली. एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. एमएमआरडीए व महामेट्रो प्राधिकरणांनी मुंबई महापालिकेशी सतत संपर्क व समन्वय ठेवून एक टीम म्हणून एकत्रितपणे कामे करावे. तसेच, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही मंत्री शेलार यांनी दिले.

एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांनी स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रूम तयार केला आहे. आपत्कालीन मदत सेवेसाठी १९ ठिकाणी रुग्णवाहिका, तसेच टीम तैनात केल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०७ ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविण्यात आले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीमध्ये मदतीसाठी या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत, अशी माहिती दोन्ही प्राधिकरणांकडून या बैठकीत देण्यात आली. प्राधिकरणांच्या बैठकीनंतर मंत्री शेलार यांनी आरोग्य खाते, महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुंबईत कोविडचे रुग्ण दाखल होत असले, तरी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब व गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या नागरिकांनी मास्क वापरावे. पुन्हा लसीकरण करण्याबाबत, तसेच कोविडच्या परिस्थितीबाबत केंद्रीय यंत्रणांसोबत बैठका सुरू आहेत. केंद्राच्या सूचनांनुसार पालिका व राज्याची आरोग्य यंत्रणा काम करत असल्याचे या बैठकीत स्पष्ट केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *