तुळजापुरातील अमली पदार्थ प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग ?

तुळजापूरमध्ये सापडलेल्या ६१ ग्रॅम अमली पदार्थ प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक झाली असून, आणखी २१ जणांचा सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या संशयितांपैकी अनेक जण तुळजाभवानी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. अमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांनी स्पष्ट केले की, तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांची अधिकृत यादी त्यांच्या कडे नाही. त्यामुळे प्रथम नोंदणी अहवाल (FIR) तपासून आरोपींमध्ये पुजारी आहेत का, हे पडताळून पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर संस्थानकडे पुजाऱ्यांची अधिकृत यादी आहे. जर गरज भासली, तर आरोपींची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुजाऱ्यांचा खरोखरच सहभाग आहे का, याबाबत सध्या तरी निश्चित माहिती देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *