वाडा: तालुक्यातील सोनाले येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २६ जून रोजी पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या (वेदिका) मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असून, संस्थाचालकांना दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. बिलघर येथील प्रकाश झाटे यांच्या दोन मुली, प्रियांका (इयत्ता सातवी) आणि वेदिका (इयत्ता पाचवी), न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होत्या. १६ जून रोजी सकाळी दोघीही पायी शाळेत गेल्या होत्या. शाळेची वेळ सकाळी १०:५० ते सायंकाळी ४:५० अशी होती. सायंकाळी ४:१५ वाजताच्या सुमारास शाळेचे शिक्षक मोतीराम नडगे हे वेदिकाला बेशुद्ध अवस्थेत गाडीतून घरी घेऊन आले. नडगे यांच्या चौकशी केली असता, त्यांनी दुपारी ३:३० वाजता मधल्या सुटीत वेदिका चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे सांगितले.
पालकांनी शाळेजवळ दवाखाना असताना वेदिकाला दवाखान्यात का नेले नाही, अशी विचारणा केली असता, नडगे यांनी काहीही उत्तर दिले नाही आणि तेथून निघून गेले. त्यानंतर, बेशुद्ध अवस्थेतील वेदिकाला तत्काळ मोटारसायकलवरून वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी ४:४५ वाजता नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदिकाला मृत घोषित केले. वेदिकावर वेळेत उपचार केले असते, तर तिचा जीव वाचला असता, असा आरोप करत प्रकाश झाटे यांनी मुलीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी केलेल्या चौकशीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. विशेषतः, घटना शालेय वेळेत घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असल्याचे अहवालात अधोरेखित केले आहे.
Leave a Reply