बीड: बीड येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक विजय पवार याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राजकीय आश्रय होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे आमदार धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्री एका पत्रकार परिषदेत केला. १५० दिवसांनंतर ते माध्यमांसमोर आले होते. त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली असून, या चौकशीत पवार आणि क्षीरसागर यांच्यातील संबंधांचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे.
विजय पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विजय पवारवर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तो रात्री ११ वाजेपर्यंत संदीप क्षीरसागर यांच्या घरी होता. “त्यांचे नाते काय आहे, हे तपासात यायला हवे,” असे मुंडे म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला की, पवारच्या कोचिंग क्लासेसमध्ये कमी फी घेऊन मुलींना वाईट मार्गाला लावले जात होते.
पीडितेच्या वडिलांना धमक्या?
मुंडे यांनी दावा केला की, विजय पवारवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांना तीन दिवसांत जवळपास २० फोन कॉल्स आले. या कॉल्समधून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुंडे यांनी पीडितेच्या पालकांची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मन हेलावल्याचे सांगितले.
शिवजयंतीच्या अध्यक्षपदावरून वाद
धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, अशा नीच व्यक्तीला संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंतीचा अध्यक्ष केले होते. हाच मुद्दा आपण सोमवारी विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसआयटी चौकशीची मागणी
मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांना हे सर्व प्रकरण सांगितल्याचे आणि एसआयटी नेमूनच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी संदीप क्षीरसागर आणि त्यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही फोन उचलला नाही, त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
Leave a Reply