नवी मुंबईत फ्लेमिंगोंच्या अधिवासाला संरक्षण : डीपीएस तलाव ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित

नेरुळमधील पामबीच मार्गालगत असलेला डीपीएस तलाव आता अधिकृतपणे फ्लेमिंगोंच्या अधिवासासाठी ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची घोषणा केली असून, त्यानंतर रविवारी, २० एप्रिल रोजी पर्यावरणप्रेमींनी आणि स्थानिक नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करत विजयी मिरवणूक काढली.

गेल्या अनेक महिन्यांपासून डीपीएस तलाव आणि त्याच्या परिसरात फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी विविध पर्यावरणसंस्था आणि नागरिकांनी सातत्याने प्रयत्न केले. साखळी आंदोलन, जनजागृती मोहिमा, प्रशासनाकडे निवेदने आणि संवाद अशा विविध माध्यमांतून त्यांनी या लढ्याला धार दिली.

गतवर्षी वनमंत्री गणेश नाईक यांनी या परिसराला भेट देत तलावात येणाऱ्या आंतरभरतीच्या पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परिणामी तलावातील जैवविविधता पूर्ववत होत गेली. ‘नॅटकनेक्ट’, ‘एन्व्हायरमेंट प्रिझर्वेशन सोसायटी’, ‘सेव्ह फ्लेमिंगोज अ‍ॅण्ड मॅंग्रोव्हज फोरम’, ‘खारघर हिल अ‍ॅण्ड वेटलँड ग्रुप’ यांसारख्या संस्थांनी एकत्रितपणे अथक प्रयत्न करून हे यश मिळवले.

“नवी मुंबई ही ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळखली जाते. मात्र फक्त या पक्ष्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. डीपीएस तलावाचे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित होणे हे सर्व नवी मुंबईकरांसाठी अभिमानाचे आणि प्रेरणादायी आहे,” असे मत माजी नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी व्यक्त केले.

“हा विजय केवळ नॅटकनेक्टचा नसून संपूर्ण नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा आहे. डीपीएस तलावासारखेच एनआरआय तलाव व इतर फ्लेमिंगो अधिवास असलेली ठिकाणे वाचवण्यासाठी आमचा लढा पुढेही सुरू राहील,” अशी भावना नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक बी. एन. एन. कुमार यांनी व्यक्त केली.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *