पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे सोमवारी वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. इंडियन सेक्युलर फ्रंटचे आमदार नवशाद सिद्दीक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभेनंतर परिस्थिती बिघडली आणि जमाव आक्रमक झाला. सोनेपूर बाजार परिसरात जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक केली. जमावाने पोलिसांची पाच दुचाकी वाहने पेटवून दिली, तसेच एका पोलिस बंदिवाहिनीवर हल्ला करण्यात आला. या घटनेत काही पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तणावग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या ३६ तासांमध्ये कोणतीही मोठी अनुचित घटना न घडता सुरक्षाव्यवस्था मजबूत ठेवण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) जावेद शमीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २०० हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच, हिंसेमुळे स्थलांतरित झालेल्या रहिवाशांना त्यांच्या मूळ ठिकाणी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे १०० ते २०० रहिवाशांनी नदी पार करून मालदा जिल्ह्यातील वैष्णवनगरमधील एका शाळेत आश्रय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी तात्पुरती निवारा व मदतीची सोय केली आहे. १२ एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या विरोधात हिंसेत तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी पुन्हा मुर्शिदाबादमधील जाफराबाद येथे सीपीआय(एम)च्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. दरम्यान, बंगाली नववर्षाच्या पूर्वसंध्येला कालीघाट मंदिरात स्कायवॉकचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. “नागरिकांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तो शांततामय आणि कायद्याच्या चौकटीतच असावा. धर्माच्या नावाखाली हिंसा घडवू नये. दंगे कशासाठी? शेवटी, आपल्याला एकटेच जन्म घ्यावा लागतो आणि एकटेच मृत्यूही येतो,” असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, राज्यात वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू केला जाणार नाही. तसेच केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात नागरिकांनी परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या १७ कंपन्या मुर्शिदाबाद आणि आसपासच्या संवेदनशील भागात तैनात केल्या आहेत. बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक रवी गांधी आणि राज्याचे पोलिस महासंचालक राजीव कुमार यांच्यात या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. स्थानिक महिला आणि नागरिकांनी गांधी यांच्या वाहनासमोर धरणे देत सुरक्षा आणि शांततेची मागणी केली. सध्या संपूर्ण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
Leave a Reply