पुणे एफटीआयआयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रात नवा अध्याय

भारतातील चित्रपट शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी असलेल्या ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय), पुणे या प्रतिष्ठित संस्थेला केंद्र सरकारच्या शिक्षण विभागातर्फे अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर एफटीआयआय आता पदव्या प्रदान करण्यास अधिकृतपणे पात्र ठरणार आहे. याचबरोबर, कोलकात्याच्या सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटलाही (SRFTI) हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

एफटीआयआयने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी अधिकृत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालाच्या आधारे काही अटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आले, ज्याचा अहवाल एफटीआयआयने १७ जानेवारी २०२५ रोजी सादर केला. आयोगाच्या ५८८व्या बैठकीत या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

एफटीआयआयची स्थापना १९६० साली प्रभात स्टुडिओच्या जागेवर करण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या या संस्थेने गेल्या सहा दशकांत अनेक नामांकित अभिनेता, दिग्दर्शक व तंत्रज्ञ घडवले आहेत. पूर्वी प्रकाश जावडेकर यांनी एफटीआयआयला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ घोषित करण्याची घोषणा केली होती, परंतु ती प्रत्यक्षात आली नव्हती. यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संस्थेला भेट देऊन दर्जासंदर्भातील प्रक्रियेला गती दिली.

एफटीआयआयचे संचालक धीरज सिंह यांनी सांगितले की, “जागतिक दर्जाचे चित्रपट शिक्षण देणारी संस्था होण्याच्या दिशेने हा टप्पा महत्त्वाचा आहे. आता संस्था पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करू शकेल, तसेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनुसार संशोधन व नवउद्योगासाठी नव्या वाटा खुल्या होतील.”

एफटीआयआयचे अध्यक्ष आर. माधवन यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “एफटीआयआय आणि एसआरएफटीआय यांना मिळालेली ही मान्यता ही केवळ संस्थांसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपट शिक्षण क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे. यासाठी झटणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचारी वर्गाचे मनापासून अभिनंदन आणि शिक्षण मंत्रालयाचे आभार मानतो.” ही मान्यता मिळाल्यामुळे भारतीय चित्रपट शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे दरवाजे खुले होतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *