ऋतुजा वार्हाडेच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजवर सैन्यात नव्हती, तरीही ती सशस्त्र दलात जाण्याचा निर्णय घेऊ शकली. ती नववीत असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) ने पहिल्यांदाच मुलींना तीन वर्षांच्या शैक्षणिक आणि लष्करी प्रशिक्षणासाठी प्रवेश द्यायला सुरुवात केली होती. ऋतुजा वडिलांनी तिच्या मनात सैन्य सेवेत जाण्याची कल्पना रुजवली. पुण्यातील थंडीत आयोजित झालेल्या एनडीएच्या पासिंग-आउट परेड मध्ये सहभागी झाल्यानंतर तिचा निर्णय निश्चित झाला.
ती परेड माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्या भव्य सोहळ्याने मला एनडीएमध्ये जाण्याची प्रेरणा दिली, असे ऋतुजाने मंगळवारी TOI ला सांगितले. १.५ लाख मुलींमध्ये ऋतुजाने देशात पहिला क्रमांक मिळवला, आणि एकूण १२ लाख उमेदवारांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. युपीएससीने ११ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला. ती जूनमध्ये एनडीएमध्ये प्रवेश घेणार असून, तीन वर्षांचे शैक्षणिक व लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीत एक वर्षाचे प्रगत लष्करी प्रशिक्षण घेईल आणि त्यानंतर लेफ्टनंट म्हणून सैन्यात नियुक्त केली जाईल.
शालेय जीवनात ऋतुजाने विविध ऑलिंपियाडमध्ये पारितोषिके पटकावली असून,इयत्ता दहावीत ९८% गुण मिळवले. तिने लेखी परीक्षेसाठी खासगी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होता. तसेच, सेवा निवड मंडळाच्या (SSB) मुलाखतीसाठी ती माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत होती आणि शारीरिक क्षमतेकडेही तिने विशेष लक्ष दिले.ऋतुजाने सांगितले की ती वडिलांचे स्वप्न साकार करत आहे.
वडिलांना सैन्यात जायचे होते, आज मी त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे याचा मला अभिमान आहे,असे तिने म्हटले. ऋतुजाचे वडील पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत आणि आई घरी ट्यूशन्स घेतात.तिच्या संपूर्ण वाटचालीत आई तिची प्रेरणास्थान राहिली आहे.महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “X” वरून ऋतुजाचे अभिनंदन करत म्हणाले,रुतुजाने पुण्याच्या नावावर इतिहास घडवला आहे. तिने सर्व मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. तिने स्वतःचा मार्ग निवडला आणि तिच्या या यशाचा संपूर्ण राज्याला अभिमान आहे.
Leave a Reply