कोइम्बतूर, तामिळनाडू – दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो. पण याच धर्तीवर तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तामिळनाडूमधील एका शाळेत अवघ्या १३ वर्षांच्या दलित विद्यार्थिनीला पहिल्यांदा मासिक पाळी आली म्हणून वर्गातून बाहेर काढण्यात आलं. इतकंच नाही, तर शाळेच्या पायऱ्यांवर बसवून तिच्याकडून परीक्षा घेतली गेली.
ही विद्यार्थिनी आठवीत शिकत होती. ५ एप्रिल रोजी मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ७ एप्रिलला विज्ञानाची आणि ९ एप्रिलला सामाजिक शास्त्राची परीक्षा तिने पायऱ्यांवर बसून दिली. ही धक्कादायक घटना तिच्या आईने कॅमेऱ्यात टिपली आणि सोशल मीडियावर व्हायरल केली.
व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीची आई संतप्त स्वरात विचारते – “मुलीला मासिक पाळी आली म्हणजे ती वर्गात बसू शकत नाही का? तिला पायऱ्यांवर बसवून परीक्षा द्यायला लावायचं?” तिच्या या प्रश्नाने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
या प्रकरणामुळे शालेय शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून, कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित केले आहे. सखोल चौकशीही सुरू आहे.
शाळेच्या प्राथमिक तपासणीत आणि पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या आईनेच मुलीला वेगळी व्यवस्था द्यावी अशी विनंती शाळेला केली होती. मात्र, याचा अर्थ मुलीला पायऱ्यांवर बसवणं नव्हता, असं तिचं म्हणणं आहे.
वेगळी व्यवस्था ही काळजी होती, शिक्षा नव्हे हे स्पष्ट करत आईने शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून या घटनेचा तीव्र निषेध केला जात असून, मासिक पाळीसारख्या नैसर्गिक प्रक्रियेबाबत शाळांमध्ये संवेदनशीलतेचं आणि योग्य शिक्षणाचं वातावरण असणं गरजेचं असल्याची जोरदार मागणी सुरू आहे.
Leave a Reply