पुण्यातील हडपसरमधील मार्व्हल बाऊंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील एका 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल ३०० मांजरी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेने यावर तातडीने कारवाईचे आदेश दिले असून, पुढील 48 तासांत सर्व मांजरी हलवण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
रहिवाशांचा पाच वर्षांपासून पाठपुरावा
या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रिंकू भारद्वाज या महिलेने गेल्या काही वर्षांपासून मांजरींचा मोठा समुदाय तयार केला. गेल्या पाच वर्षांपासून रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र कुठलीही ठोस कारवाई झाली नव्हती.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार,
फ्लॅटच्या आजूबाजूला तीव्र दुर्गंधी पसरली होती. घरातून मांजरींच्या सतत ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते.परिसरातील लोकांना आरोग्य धोक्याची भीती वाटत होती.
या फ्लॅटमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. तेथे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले की, सुरुवातीला ५०-६० मांजरी होत्या, मात्र त्यांची संख्या वाढत जाऊन ३०० वर पोहोचली.
रहिवाशांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर, अधिकाऱ्यांनी फ्लॅटमध्ये ३०० मांजरी असल्याची पुष्टी केली. पुणे महापालिकेने या मांजरींना हलवण्याचे आदेश दिले असून, ४८ तासांत कारवाई पूर्ण करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की,जर मालकीण महापालिकेच्या आदेशाचे पालन करत नसेल, तर सर्व मांजरींना प्राणी आश्रयस्थळी हलवण्यात येईल. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, मांजरींची योग्य निगा राखली जात आहे का, यावरही लक्ष ठेवले जात आहे.
Leave a Reply