कोल्हापूर रिक्षाचालक त्यांच्या अनोख्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. यंदाही कोल्हापुरात २६ जानेवारीच्या निमित्ताने रिक्षांची सौंदर्य स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेकडून आयोजित या स्पर्धेत कोल्हापूरसह इतर जिल्ह्यांमधील रिक्षाचालकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला तब्बल पंचवीस वर्षांची परंपरा असून यंदा २५ हून अधिक आकर्षक रिक्षा सजवून सादर करण्यात आल्या होत्या. विविध ऐतिहासिक आणि आधुनिक थीम्सवर आधारित या रिक्षांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तसेच गड-किल्ल्यांच्या प्रतिमा आणि त्यांची माहिती देणाऱ्या ऐतिहासिक थीमवरील रिक्षा विशेष आकर्षण ठरल्या. काही रिक्षांवर गड-किल्ल्यांचे बुरुज, कमानी आणि मावळ्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. याशिवाय, अंबाबाई मंदिराची प्रतिकृती असलेल्या रिक्षांनीही रसिकांचे लक्ष वेधले. आधुनिक सुविधांनी सजलेल्या रिक्षांमध्ये फॅन, आकर्षक बैठकव्यवस्था आणि चालकाच्या समोर एलईडी स्क्रीन यांचा समावेश होता. या रिक्षांनी प्रवासाचा अनुभव अधिक सुखद बनवण्याचा प्रयत्न केला.
स्पर्धेत एका रिक्षाचालकाने आपल्या रिव्हर्स रिक्षा चालवण्याच्या अनोख्या शैलीमुळे विशेष प्रशंसा मिळवली. त्याशिवाय इतर रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षांवर सादर केलेली कलाकुसर आणि सजावट पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.
ही रिक्षा सौंदर्य स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांमधून रसिक आवर्जून उपस्थित होते. काही लोक विशेषत,पंढरपूरहून कोल्हापुरात येऊन या स्पर्धेचा आनंद घेत होते. सोशल मीडियावर या स्पर्धेचे व्हिडिओ पाहून आलेल्या लोकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

पुरेपूर कोल्हापूर! रिक्षांची सौंदर्य स्पर्धा, आकर्षक रिक्षांनी वेधलं सर्वांचं लक्ष
•
Please follow and like us:
Leave a Reply