ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रॅपिडो बाईक टॅक्सीवर कारवाईचे आदेश देणारे सरनाईक, महिनाभरातच त्यांच्या मुलाच्या ‘प्रो गोविंद’ कार्यक्रमासाठी रॅपिडोला प्रमुख प्रायोजक म्हणून स्वीकारल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरनाईकांनी स्वतः तीन वर्षांपासून ‘प्रो गोविंद’चे रॅपिडो प्रायोजक असल्याचे सांगितले असले तरी, त्यांच्या कारवाईनंतर लगेचच त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमात रॅपिडोची स्पॉन्सरशिप स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कारवाईची भीती दाखवून प्रायोजकत्व?
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सरनाईकांवर गंभीर आरोप केला आहे. ‘कारवाईची भीती घालून रॅपिडोला १० कोटी रुपयांचे प्रायोजकत्व घेण्यास भाग पाडण्यात आले’, असा दावा त्यांनी केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याला ‘खंडणी वसुलीचा प्रकार’ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘आपल्या मंत्र्यांचा हा प्रताप थांबवावा’ असे आवाहन केले आहे.
सरनाईकांचे प्रत्युत्तर आणि विरोधकांवर टीका
सरनाईक यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. रोहित पवार हे विरोधी पक्षातील सदस्य असून, ‘आरोप केल्याशिवाय त्यांचे दुकान चालणार नाही’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. ‘प्रो गोविंद’ आणि रॅपिडो यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रायोजकत्वाचा संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला.
वाद कसा सुरू झाला?
या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा सरनाईकांनी स्वतःचे नाव वापरून रॅपिडो बाईक टॅक्सी बुक केली. बाईकचालक आल्यावर त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. या कृतीची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. या घटनेला जेमतेम महिना पूर्ण होत नाही तोच, आता वरळीमध्ये सरनाईकांचे पुत्र पूर्वेश यांनी आयोजित केलेल्या ‘प्रो गोविंद’ कार्यक्रमाचे रॅपिडो प्रमुख प्रायोजक बनले आहेत. या दुहेरी भूमिकेमुळे सरनाईकांवर टीका होत आहे. राज्य सरकारने बाईक टॅक्सीसाठी धोरण स्वीकारले असले तरी अद्याप कोणत्याही कंपनीला अधिकृत परवानगी दिलेली नाही, तरीही रॅपिडो ॲपद्वारे सेवा सर्रास सुरू आहे. यामुळे बाईक टॅक्सीच्या धोरणावर आणि सरनाईकांसारख्या मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Leave a Reply