रविवारी रात्रीपासून मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे नद्या-नाले भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान खात्याने सोमवारी (15 सप्टेंबर) राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, बीड, सोलापूर आणि अहिल्यानगर येथे 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथा या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, नागपूर, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषत: मुंबईत पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सोमवारीप्रमाणेच मंगळवारी (16 सप्टेंबर) देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, संभाजीनगर, गडचिरोली व चंद्रपूर या भागांत पावसाचा जोर अधिक राहील. मुंबई, ठाणे, पालघर वगळता राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज असेल तरच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply