मुंबई: मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आता मनसे आणि उद्धवसेना एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षांनी यापूर्वी जाहीर केलेल्या मोर्चाच्या तारखांमध्ये बदल केला असून, आता हा मोर्चा 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस आणि शरद पवार गट देखील सहभागी होणार आहेत.
महायुतीत मतभेद, महाविकास आघाडीत एकजूट
हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली ते चौथी हिंदी नसावी, मात्र पाचवीपासून हिंदीची सक्ती करावी असे मत मांडले आहे. याउलट शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असलेल्या शिंदेसेनेच्या नेत्यांची मात्र यामुळे अडचण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही निर्णय लादला जाणार नाही असे म्हटले आहे, तर शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरेंची समजूत घालताना दिसत आहेत.याउलट, हिंदीच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला ५ जुलैची तारीख जाहीर केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी ७ जुलैची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मोर्चासोबतच आपला मोर्चा काढण्यास सहमती दर्शवल्याचे उद्धवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंचे एकत्र येणे, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा?
खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, “आमची बैठक संपल्यानंतर राज यांचा फोन आला. मराठी माणसांसाठीचे दोन मोर्चे वेगळे निघणे बरे दिसत नाही, एकत्र आंदोलन झाल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल, अशी भूमिका राज यांनी मांडली.” त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनीही “मराठी माणसाचे ऐक्य दिसणे महत्त्वाचे आहे,” असे म्हटले.
या मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने, “महाविकास आघाडीत राज ठाकरे हे चौथे स्तंभ असतील का,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “हिंदी सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र निघणारा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असेल.”
राजकीय जाणकारांच्या मते, हे एकत्र येणे केवळ मोर्चासाठी असले तरी, त्याची सुरुवात म्हणून 5 जुलैच्या मोर्चाकडे पाहिले जात आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे काँग्रेस आणि शरद पवार गटाला मान्य असेल का, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. तरीही, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे या मोर्चात एकत्र येणे महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकते, असे जाणकारांना वाटते. या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर सर्व पक्ष, संस्था, साहित्यिक आणि मराठीप्रेमींचा एकच मोर्चा निघावा अशी काँग्रेसची भूमिका होती, असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न असतो, तेव्हा महाराष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून आमचा पक्ष उभा राहतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे हा आमचा आग्रह आहे,” असे म्हटले आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तिसऱ्या भाषेचा विचार करताना मुलांवर ताण पडू नये, याचा विचार केला गेला असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधक खोटे ‘नॅरेटिव्ह’ तयार करत असल्याचा आरोप केला आहे.
Leave a Reply