मुंबई : दीड वर्षांच्या ब्रेकनंतर शिवाजी पार्क जिमखाना अखेर पुन्हा एकदा सदस्यांसाठी नव्या रूपात खुला होत आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, जिमखाना सदस्यांसाठी “भारतरत्न” सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते खुला होणार आहे. मधल्या काळात जिमखान्याच्या पुनर्निर्माण आणि आधुनिकीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन, या असंख्य क्रिकेटपटू जन्माला घालणाऱ्या जिमखान्याच्या पुनर्विकास प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. त्यामुळेच, एक नितांतसुंदर वास्तु तयार झाली आहे, जी फक्त दादर नाही तर, मुंबईचे आकर्षण ठरेल.
१९०९ साली या जिमखान्याची स्थापना झाली होती. सुरुवातीला त्याचे नाव होते दादर हिंदू जिमखाना. त्याकाळी माहीम पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेचं नाव पुढे शिवाजी पार्क झालं आणि जिमखान्यानेही शिवाजी पार्क जिमखाना हे नाव धारण केलं. स्वातंत्र्यपूर्व काळात जेंव्हा मुंबईतील जिमखाने हे ब्रिटिशांच्या वर्चस्वाचे प्रतीक मानले जात होते, तेंव्हा हा जिमखाना स्थानिकांच्या ओळखीचा, स्वाभिमानाचा ठरला.
या जिमखान्याच्या भव्य वास्तूने स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, तसेच अनेक राजकीय घडामोडी जवळून पाहिल्या आहेत. तसेच, क्रीडाक्षेत्रातील अनेक तारे येथे घडले. विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, अजित वाडेकर, संदीप पाटील यांच्यासह भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही या मैदानावर घडताना पाहिलं आहे. दादर-माहीम परिसर साहित्यिक, कलाकार आणि खेळाडूंनी समृद्ध झाला असून त्याचा केंद्रबिंदू शिवाजी पार्क व हा जिमखाना राहिला आहे.
आजपासून अवघ्या नऊ वर्षांनी हा जिमखाना १२५ वर्षांचा होणार आहे. चार ते सहा पिढ्या येथे वाढल्या असून आता नव्या पिढीच्या अपेक्षांनुसार आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच जिमखान्याचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू करण्यास जिमखाना सज्ज झाला आहे. शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सुरू होत असल्याने सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जिमखान्यावतीने दिलेल्या निवेदनात या काळात झालेल्या गैरसोयीबद्दल सदस्यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
Leave a Reply