मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे. ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. थोड्यावेळापूर्वी वांद्रेतील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये राज ठाकरे पोहोचले होते. त्यानंतर थोड्यावेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पोहोचला. तसं पाहायला गेलं तर दोघांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मात्र, ही भेट यासाठी महत्वाची आहे त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव सेना एकत्र येणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. लवकरचं दोन्ही भावांमध्ये मनोमिलन होईल असं बोललं जातं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्र बॅनर्स देखील लावलेत.अशात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे. त्यामुळे राज-उद्धव यांच्या संभाव्य युतीला ब्रेक लागणार का? लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसे भाजपला पाठिंबा देणार का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या भेटीत देवेंद्र फडणवीस गेम फिरवणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे गट आणि मनसे पक्षातील पहिल्या ते शेवटच्या फळीतील नेते युतीसाठी सकारात्मक होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखून असलेल्या चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे वारे ओळखून योग्यावेळी शिवेसना-मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलावले असावे का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Leave a Reply