मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या नवीन शिक्षण धोरणाला तीव्र विरोध करत हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एल्गार पुकारला आहे. या धोरणानुसार, इयत्ता पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून अप्रत्यक्षपणे हिंदी भाषा लादली जात असल्याचा दावा मनसेने केला आहे. याच्या निषेधार्थ, येत्या ६ जुलै रोजी मुंबईत गिरगावातून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे.
आज राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सरकारच्या भूमिकेविषयी चर्चा केली. मात्र, या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारची भूमिका अजिबात मान्य नसल्याचे स्पष्ट केले. “सरकारने आम्हाला पटवून देण्याचा प्रश्नच नाही, आम्हाला ही भूमिका मान्य नाही,” असे ते म्हणाले. या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितले की, खरं तर पर्यायी भाषेचा मुद्दा पाचवी नंतर येतो. तसेच, नवीन शिक्षण धोरण (NEP) राज्यांवर अवलंबून असताना महाराष्ट्र सरकार असे का करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “सीबीएसई शाळा आयएएस अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत आणि आता त्यांचे वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाकीची राज्ये अशी भूमिका घेत नाहीत, मग महाराष्ट्र का घेत आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला. या संपूर्ण प्रकरणाला मनसेचा विरोध आहे आणि तो कायम राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
६ जुलै रोजी निघणारा हा मोर्चा मराठी माणसांचा असेल, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
Leave a Reply