छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा CA फायनलमध्ये देशात अव्वल; मुंबईचा मानव शाह तिसरा

छत्रपती संभाजीनगर/मुंबई: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) मे महिन्यात घेतलेल्या CA फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात छत्रपती संभाजीनगरच्या राजन काबराने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मुंबईचा मानव शाह देशात तिसरा आला आहे. राजनने ६०० पैकी ५१६ गुण मिळवले. कोलकाता येथील निष्ठा बोध्रा ५०३ गुणांसह देशात दुसरी आली, तर मानव शाहला ४९१ गुण मिळाले.
राजन काबरा देशात पहिला आल्याने छत्रपती संभाजीनगर शहराने ३९ वर्षांत पहिल्यांदाच इतिहास घडवला आहे.

अभ्यासात सातत्य ठेवले”, राजन काबरा यांची प्रतिक्रिया

देशात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर राजन काबरा यांनी सांगितले की, “दररोज एवढे तास अभ्यास करायचा, असा नियम केला नव्हता; पण अभ्यासात सातत्य ठेवले होते. ICAI चे राष्ट्रीय अध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा यांचा फोन आला आणि त्यांनी मला देशात पहिला आल्याची बातमी दिली व अभिनंदन केले. तेव्हा, विश्वासच बसला नाही. नंतर देशभरातून फोन येऊ लागले आणि मला व माझ्या कुटुंबाला एवढा आनंद झाला की, आभाळ ठेंगणे झाले. नोकरी करायची की व्यवसाय करायचा, याचा अजून निर्णय घेतलेला नाही. वडील सीए मनोज काबरा हे माझ्यासमोर आदर्श राहिले आहेत.” विशेष म्हणजे, राजन काबरा इंटरमीडिएट आणि फाउंडेशन परीक्षेतही देशात अव्वल ठरले होते. फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि CA अंतिम परीक्षेत एकाच विद्यार्थ्याने देशात टॉपर येण्याचा विक्रम राजन काबराच्या नावावर नोंदवला गेला आहे. देशभरातून ९९,४६६ विद्यार्थ्यांनी CA ची परीक्षा दिली होती.

CA इंटरमीडिएटमध्येही संभाजीनगरचा ‘यश’ दुसरा

CA इंटरमीडिएट परीक्षेत मुंबईतील दिशा गोखरू देशात पहिली आली, तर छत्रपती संभाजीनगरचा यश देविदान दुसरा आला. दिशाला ५९३, तर यशला ५०३ गुण मिळाले. जयपूरची यमिश जैन आणि उदयपूरचा निलय डांगी यांनी एकत्रित तिसरा क्रमांक पटकावला. त्या दोघांना ५०२ गुण मिळाले. छत्रपती संभाजीनगरमधील यश संदीप देविदान याने ऑल इंडिया रँक २ (AIR-२) पटकावला. तसेच मीत मनोज जैन (AIR-९) आणि संकेत माणिकचंद कासलीवाल (AIR-७), आणि फाउंडेशन परीक्षेत श्रावणी मुंदडा हिने (AIR-१७) देशात १७वा क्रमांक प्राप्त केला आहे.

CA फाउंडेशन परीक्षेत मुंबईचा यज्ञेश दुसरा

CA फाउंडेशन परीक्षेत वृंदा अग्रवाल ३६२ गुण मिळवून देशात अव्वल ठरली, तर मुंबईचा यज्ञेश नारकर ३५९ गुण मिळवून दुसरा आला. ठाण्याच्या शार्दूल विचारे याने ३५८ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

रोज १० ते १२ तास अभ्यास केला”, मानव शाहची प्रतिक्रिया

CA फायनलमध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या मानव शाहने सांगितले की, “दररोज १० ते १२ तास अभ्यास करत होतो. या यशामुळे आई-वडिलांना आनंद झाला. मोठा भाऊ सीए आहे, त्याने अभ्यासात मदत केली.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *